मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

कुळीथाचा पोळा (कुळीथ, कुळीथ पीठ, कुळीथ पीठ रेसिपी, कुळीथ खाण्याचे फायदे, कुळीथ फायदे मराठी, हुलगे खाण्याचे फायदे)

कुळीथाचा पोळा 

कुळीथाचा पोळा (कुळीथ, कुळीथ पीठ, कुळीथ पीठ रेसिपी, कुळीथ खाण्याचे फायदे, कुळीथ फायदे मराठी, हुलगे खाण्याचे फायदे)
कुळीथाचा पोळा

Links To Read Blog On Kulithacha Pola In Other Languages :

Blog On Kulithacha Pola In English

पदार्थाविषयी माहिती :

कुळीथाच्या पिठापासून ज्याप्रमाणे कुळीथाची पिठी बनवली जाते त्याप्रमाणेच कुळीथाचा पोळा, कुळीथाचे डांगर हे अन्य चवदार पदार्थ देखील कोकणात विशेष प्रसिद्ध आहेत आणि रोजच्या न्याहारीसाठी खासकरून बनवले जातात. कुळीथाचा पोळा बनवण्यासाठी फार काही जिन्नस आवश्यक नसते, फक्त कुळीथाचे पीठ हाताशी असले की घरातीलच हळद, मीठ, खाण्याचा सोडा, मसाला किंवा हिरव्या मिरच्या हे मोजकेच जिन्नस वापरून अतिशय सुरेख आणि चवदार पदार्थ खूपच कमी वेळात पटकन बनवता येऊ शकतो. कुळीथाचा पोळा हा गरमागरम खाण्यातच अधिक मज्जा आहे. कोकणात भाताच्या पिकासोबतच कुळीथाचे पीक जास्त प्रमाणावर घेतले जाते, त्यामुळे कुळीथाचे धान्य दळून त्याच्या बारीक पिठापासून घरच्याघरी बऱ्यापैकी अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले देखील जातात, जे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात.           

विशेषता :

कुळीथाच्या पोळ्याची विशेषता अशी आहे की जर घरात कोणतीही भाजी बनवण्यासाठी शिल्लक नसेल आणि चपाती किंवा भाकरी यासोबत खायला भाजी बनवली नसेल आणि त्यातच वेळेची मर्यादा असेल तर कुळीथाचा पोळा भाजीऐवजी बनवून खाऊ घालणे हा त्यावरील उत्तम उपाय आहे असे म्हणता येईल. एकदा का कुळीथाचे पीठ जवळ असेल तर त्यापासून कुळीथाचा पोळा हा अगदी कमी साहित्यात झटपट होणारा कोकणातील चविष्ट पदार्थ आहे. कुळीथाचा पोळा हा भाकरी किंवा चपाती सोबत खाण्यासाठी फार रुचकर लागतो, म्हणून घरात भाजी नसेल तर भाकरी किंवा चपातीसोबत गरमागरम आणि कुरकुरीत कुळीथाच्या पोळ्याचा आस्वाद मोठ्या आनंदाने घेता येऊ शकतो.        

साहित्य :

१) तेल 
२) दोन बारीक चिरलेले कांदे 
३) हळद
४) खाण्याचा सोडा
५) मसाला किंवा हिरवी मिरची
६) मीठ 
७) पाणी
८) कुळीथ धान्याचे बारीक दळलेले दोन वाटी पीठ  

कृती :

१) कुळीथाचा पोळा बनवण्यासाठी प्रथम एक मोठे गोलाकार पात्र किंवा भांडे घ्या. त्या भांड्यात कुळीथ धान्याचे बारीक दळलेले दोन वाटी पीठ घ्या. नंतर या कुळीथाच्या पिठात दोन बारीक चिरलेले कांदे, अर्धा चमचा हळद, चिमूटभर खाण्याचा सोडा (कुळीथाचे पोळे बनवताना जर पिठात चिमुटभर खाण्याचा सोडा घातला तर पोळे अधिक कुरकुरीत बनतात), दीड चमचा मसाला किंवा आवडीनुसार मसाल्याऐवजी दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घालून त्यात चवीनुसार मीठ घाला.
२) पहिल्यांदा हे सर्व जिन्नस कुळीथाच्या पिठात हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि नंतर त्यात अंदाजानुसार थोडेसे पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. एकजीव करून तयार झालेले पिठाचे मिश्रण हे छोटे आणि चप्पट आकाराचे गोलाकार गोळे बनवता येतील इतके जाडसर असणे आवश्यक आहे. नंतर या एकजीव केलेल्या मिश्रणाचा एक पिठाचा मोठा गोळा तयार करून घ्या.   
३) मग हातावर थोडे तेल लावून या पिठाचे छोट्या आकाराचे एकसमान चपटे गोल गोळे बनवून घ्या.
४) यानंतर मध्यम आचेवर गॅस चालू करून त्यावर एक पसरट तवा ठेवा. तवा चांगला गरम झाल्यानंतर त्या तव्यावर दोन चमचे तेल घाला. तेल चांगले गरम झाल्यावर या तेलात हे बनवलेले गोलाकार गोळे मोठ्या आचेवर एका बाजूने लालसर, तांबूस रंगाचे होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. आवश्यकतेनुसार या कुळीथाच्या गोळ्यांवर वरून चमच्याने थोडे थोडे तेल सोडा, जेणेकरून पीठ तव्याला चिकटणार नाही.
५) कुळीथाचे गोळे एका बाजूने खरपूस भाजल्यानंतर ते पलित्याने परतून दुसऱ्या बाजूने सारख्याच पद्धतीने भाजून घ्या. अशा रीतीने दोन्ही बाजूंनी कुळीथाचे गोळे व्यवस्थित भाजून घ्या. मोठ्या आचेवर कुळीथाचे गोळे त्वरितपणे उत्तम प्रकारे भाजले जातात, त्यामुळे दुर्लक्ष केल्यास ते करपण्याची शक्यता जास्त असते, म्हणून कुळीथाचे पोळे भाजताना ते फार करपू नये यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 
६) कुळीथाचे गोळे दोन्ही बाजूंनी लालसर, तांबड्या रंगाचे झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या आणि मग गॅस बंद करा. कुळीथाचे गोळे हे चपातीप्रमाणे म्हणून पोळीभाजीतल्या पोळीप्रमाणे तव्यावर कच्चे राहणार नाहीत अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेतले जातात, त्यामुळे कुळीथाच्या गोळ्यांना कुळीथाचे पोळे असे देखील म्हटले जाते. याप्रमाणे गरमागरम, कुरकुरीत आणि स्वादिष्ट असे कुळीथाचे पोळे चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी तयार होतील.  

चव :

कुरकुरीत, चमचमीत आणि चविष्ट