मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

बटाट्यांचे मसालेदार काप (बटाट्याचे पदार्थ, बटाट्याचे फायदे, बटाट्याचे काप)

बटाट्यांचे मसालेदार काप

बटाट्यांचे मसालेदार काप (बटाट्याचे पदार्थ, बटाट्याचे फायदे, बटाट्याचे काप)
बटाट्यांचे मसालेदार काप

Links To Read Blog In Other Languages On Batatyanche Masaledar Kaap :

Blog On Batatyanche Masaledar Kaap In English

पदार्थाविषयी माहिती :

बटाट्यांचे मसालेदार काप हा कोकण प्रांतातील सुप्रसिद्ध पदार्थ आहे आणि या पदार्थाची चव ही अतिशय उत्कृष्ट असून हा पदार्थ बनवण्याची पद्धत देखील तितकीच साधीसरळ आणि सोपी आहे. याशिवाय बटाट्यांचे मसालेदार काप बनवण्यासाठी जास्त काही साहित्याची आवश्यकता लागत नाही. घरात उपलब्ध असणाऱ्या आणि रोजच्या जेवणात सामाविष्ट असणाऱ्या हळद, मसाला, मीठ या जिन्नसांचा योग्य प्रमाणात वापर करून बटाट्यांचे मसालेदार काप अगदी सहजतेने बनवता येऊ शकतात. कोकण प्रांतात बटाट्यांचे मसालेदार काप हा पदार्थ मोठ्या आवडीने तांदळाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवला जातो आणि कोकणात हा पदार्थ सर्व लोकांच्या विशेष आवडीचा अतिशय चविष्ट असा पदार्थ आहे.

विशेषता :

बटाट्यांचे मसालेदार काप या पदार्थाची विशेषता म्हणजे हा पदार्थ आपण नाश्त्याला चपाती किंवा भाकरी यांसोबत खाण्यासाठी बनवू शकतो. जर घरात नाश्त्याला भाकरी किंवा चपाती सोबत खायला बनवण्यासाठी कोणतीही अन्य भाजी उपलब्ध नसेल आणि फार कमी वेळात अतिशय रुचकर असा पदार्थ बनवायचा असेल तर अशा वेळेस आपण बटाट्यांचे मसालेदार काप हा पदार्थ बनवू शकतो. बटाट्यांचे मसालेदार काप हे भात, डाळ यांसोबत खाण्यासाठी देखील अतिशय स्वादिष्ट लागतात. या पदार्थाची आणखी एक विशेषता अशी की हे काप तव्यावर भाजून बनवले जातात त्यामुळे त्यांची चव फार उत्तम लागते, शिवाय बटाट्यांच्या कापांना मीठ, हळद आणि मसाला लावून तव्यावर तेलात खरपूस भाजून घेतल्यामुळे बटाट्यांचे काप अधिक खमंग लागतात. बटाट्यांच्या कापांना हळदीमुळे पिवळसर आणि मसाल्यामुळे लालसर असा रंग येतो आणि त्यामुळे काप आणखी छान दिसतात. 

साहित्य :

१) तेल
२) पाच ते सहा बटाटी
३) हळद
४) मसाला
५) मीठ

कृती :

१) बटाट्यांचे मसालेदार काप बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा पाच ते सहा बटाटी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जेणेकरुन बटाट्यांच्या सालीवरील माती निघून जाईल. मग सोलण्याच्या साहाय्याने काळजीपूर्वक बटाट्यांची साल काढून घ्या. त्यानंतर विळीवर किंवा सुरीच्या साहाय्याने या बटाट्यांचे एका मोठ्या पसरट ताटामध्ये गोलाकार काप करून घ्या.
२) नंतर एका मोठया टोपामध्ये पाणी घेऊन त्यात हे बटाट्यांचे सर्व गोलाकार काप पाच ते सात मिनिटे भिजत ठेवा, असे केल्याने बटाट्यांच्या कापांचा रंग लालसर होणार नाही आणि बटाट्यांच्या कापातील अतिरिक्त स्टार्च देखील निघून जाईल.
३) पाच ते सात मिनिटांनी टोपामध्ये भिजत ठेवलेल्या बटाट्यांच्या कापांमधील पाणी काढून टाका. मग या बटाट्यांच्या कापांमध्ये अर्धा चमचा हळद, एक चमचा मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. हे सर्व जिन्नस बटाट्यांच्या कापांना सर्वत्र लागण्यासाठी व्यवस्थित एकजीव करून घ्या.
४) एकदा का बटाट्यांना हळद, मसाला आणि मीठ व्यवस्थित लावून घेतले की मग बटाट्यांचे मसालेदार काप बनवणे फार सोपे होऊन जाते.
५) यानंतर गॅस चालू करून त्यावर एक पसरट तवा ठेवा. गॅस मध्यम आचेवर करून तवा गरम होण्यासाठी ठेवून द्या. एकदा का तवा व्यवस्थित गरम झाला की गॅस मंद आचेवर करून मग त्यावर सात ते आठ चमचे तेल घाला आणि टोपात हळद, मसाला आणि मीठ लावून घेतलेले बटाट्यांचे काप संपूर्ण तव्यावर घाला. पुन्हा गॅस मध्यम आचेवर करून हे सर्व काप एका बाजूने लालसर, तांबूस रंगाचे होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. तव्यावरील तेल संपल्यास तव्यावर बटाट्यांचे काप खरपूस भाजण्यासाठी आवश्यतेनुसार आणखी चमचे तेल घाला. चमचाच्या साहाय्याने बटाट्यांचे काप दुसऱ्या बाजूला भाजण्यासाठी काळजीपूर्वक पद्धतीने परतून घ्या. बटाट्यांचे काप व्यवस्थित भाजले आहेत की नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी काट्याचा चमचा बटाट्यांच्या कापांमध्ये उभा खुपसून बघा. जर काट्याचा चमचा आत गेला आणि बटाटे नरम लागले तर बटाट्यांचे काप व्यवस्थित भाजले गेले आहेत याची खात्री करून घेता येईल.
६) बटाट्यांचे काप लालसर, तांबूस रंगाचे झाल्यावर एका ताटात हे सर्व काप चमचाच्या मदतीने व्यवस्थित काढून घ्या. अशा पद्धतीने उरलेले बटाट्यांचे काप देखील तव्यावर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या.
७) अशा रीतीने स्वादिष्ट, उत्कृष्ट, खमंग, चवदार असे तव्यावर तेलात खरपूस भाजून घेतलेले बटाट्यांचे मसालेदार काप गरमागरम तांदळाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या भाकरीसोबत खाण्यासाठी तयार होतील.

चव :

चविष्ट, स्वादिष्ट, चमचमीत आणि मसालेदार