मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप (सुरण कंद, सुरण भाजी फायदे, सुरण म्हणजे काय, सुरणाचे काप, सुरण रेसिपी, सुरणाची भाजी)

तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप

तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप (सुरण कंद, सुरण भाजी फायदे, सुरण म्हणजे काय, सुरणाचे काप, सुरण रेसिपी, सुरणाची भाजी)
तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप

Links To Read Blog On Talalele Masaledar Aani Kurkurit Suranache Kapp In Other Languages :

Blog On Talalele Masaledar Aani Kurkurit Suranche Kaap In English

पदार्थाविषयी माहिती :

तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप हा कोकण प्रांतातील एक खास पदार्थ असून या पदार्थाचा आस्वाद हा तांदळाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या भाकरीसोबत किंवा गव्हाच्या पीठासोबत बनवल्या जाणाऱ्या चपातीसोबत, तसेच गरमागरम भात आणि वाटपाची तिखट डाळ यांसोबत घेतला जातो. तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप हा पदार्थ चवीला आंबट आणि तिखट असा लागतो. याशिवाय सुरणाची भाजी खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत, कित्येक विकारांवर सुरणाची भाजी ही खूप फायदेशीर आहे, सुरणाची भाजी ही कंद भाजी असल्यामुळे ही भाजी तीनही ऋतूंमध्ये बाजारात सहज उपलब्ध होते, सुरणाची भाजी खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते, तसेच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते, अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी सुरण खूप फायदेशीर आहे, सुरणाची भाजी खाल्ल्याने कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी देखील मदत होते, या भाजीचा अन्य महत्वाचा फायदा असा आहे की सुरणामध्ये ग्लायसेमिक निर्देशांक (ग्लायसेमिक निर्देशांक हा ० ते १०० पर्यंतची संख्या दर्शवतो जी संख्या अन्नासाठी नियुक्त केली जाते, ज्यामध्ये शुद्ध ग्लुकोजला अनियंत्रितपणे १०० ची संख्या दिली जाते, तसेच १०० हा निर्देशांक अन्न खाल्ल्यानंतर दोन तासांनी रक्तातील ग्लुकोजच्या पातळीमध्ये होणारी सापेक्ष वाढ दर्शवतो. ) हा फार कमी असल्यामुळे मधुमेहाच्या आजरावर नियंत्रण राखण्यास मदत होते, शिवाय सुरणाची भाजीमध्ये उत्तम दर्जाचे अँटिऑक्सिडेंट्स असतात, जे मानवाचे स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी साहाय्य करतात. खरे पाहता, बऱ्याच जणांना सुरणाची भाजी ही फारशी आवडत नाही, परंतु असंख्य गुणकारी फायदे असलेल्या सुरणाच्या भाजीचा शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने आहारात समावेश करणे फार गरजेचे आहे. ज्यांना सुरणाची भाजी खाण्यासाठी आवडत नाही, त्यांच्यासाठी सुरणाचे चविष्ट काप हा एक पौष्टिक उपाय ठरू शकतो. बहुतेक लोकांना आंबट, मसालेदार चवीचे चमचमीत पदार्थ खायला जास्त आवडतात, त्यांच्यासाठी तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप हा पदार्थ घराच्या घरी आवडीने बनवता येऊ शकतो.

विशेषता :

तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप या कोकण प्रसिद्ध पदार्थाची मुख्य विशेषता म्हणजे या पदार्थाची आंबट चिंबट आणि तिखट चव होय. आपल्या सर्वांना ठाऊक असेलच की सुरणाच्या भाजीला खाज असते त्यामुळे सुरणाच्या भाजीचे काप बनवताना भाजीला असणारी खाज घालवण्यासाठी कोकम रस लावला जातो, कोकण प्रांतात घरोघरी बनवल्या जाणाऱ्या जेवणामध्ये कोकम किंवा आगूळ हे प्रामुख्याने वापरले जाते, कोकमाचा रस वापरल्याने सुरणाला आंबटपणा येऊन सुरणाची खाज निघून जाते आणि सुरणाचे काप हे अधिकच स्वादिष्ट बनतात. तसेच कापांना कोकमाचा रस, मीठ आणि मसाला लावून तेलात तळून घेतले जाते, त्यामुळे सुरणाच्या कापांची चव आंबट आणि तिखट अशी होते, सुरणाचे काप तेलामध्ये तळल्यामुळे उत्तम प्रकारे कुरकुरीत बनतात आणि बहुतेक जणांना तेलात तळलेले चटपटीत पदार्थ खाण्यासाठी विशेष आवडतात, म्हणूनच कोकणात विशेष प्रसिद्ध असलेले तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप हा रुचकर आणि पौष्टिक बेत नाश्त्याला किंवा जेवणावर बनवता येऊ शकतो.    

साहित्य :

१) तेल
२) एक मोठे सुरण
३) कोकम
४) पाणी
५) मसाला
६) मीठ

कृती :

१) तळलेले मसालेदार आणि कुरकुरीत सुरणाचे काप बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा एक मोठे सुरण घ्या. मग विळीवर या सुरणाच्या भाजीची गर्द तपकिरी रंगाची साल व्यवस्थित काळजीपूर्वक पद्धतीने कापून काढून टाका.
२) सुरणाच्या भाजीवरील कडक सालीचे आवरण काढून टाकल्यानंतर या सुरणाच्या भाजीचे विळीवर चार भाग करून घ्या आणि मग या सुरणाचे एका मोठ्या टोपामध्ये लांबडे मध्यम आकाराचे काप करून घ्या. सुरणाचे हे सर्व काप पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जेणेकरुन या कापांमधील माती निघून जाईल.
३) सुरणाच्या भाजीला खाज असल्यामुळे जर आपण ते असेच मसाला आणि मीठ लावून तळून खाल्ले तर घशाला आतून खाज उठण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे सुरणाच्या कापांना असणारी खाज निघून जाण्यासाठी कोकण विभागात कोकम किंवा आगुळ वापरले जाते. कोकम रस किंवा आगुळ हे सुरणाच्या कापांना लावून ठेवले तर सुरणाला असलेली खाज निघून जाते, शिवाय सुरणाला आंबट चिंबट अशी लज्जतदार चव देखील येते आणि काप अधिकच उत्कृष्ट बनतात. म्हणूनच सुरणाचे काप तळून घेण्यासाठी पहिल्यांदा आठ ते दहा कोकम घ्या आणि मग टोपामध्ये असलेल्या सुरणांच्या कापांवर या कोकमांचा रस पिळा. यानंतर या कापांमध्ये एक ते दिड चमचा मसाला आणि चवीनुसार मीठ घाला, हे सर्व जिन्नस म्हणजे कोकम, मसाला आणि मीठ हे कापांना सर्वत्र व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने लावा.
४) यानंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा आणि या कढईत सुरणाचे काप तळून घेण्यासाठी आवश्कतेनुसार तेल घाला.
५) गॅस मध्यम आचेवर करून कढईमधील तेल गरम होण्यासाठी ठेवून द्या. एकदा का तेल गरम झाले की सुरणाचे काप सहजपणे तळून घेता येतील.
६) तेल व्यवस्थित गरम झाल्यावर गॅस मंद आचेवर करून घ्या आणि मग अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने या टोपातील सुरणाचे काप या गरम तेलात तळून घ्या. सुरणाच्या कापांना मीठ लावल्यामुळे त्यांना पाणी सुटते त्यामुळे काप तेलात सोडताना अंगावर तेल उडणार नाही याची विशेष काळजी घ्या. नंतर गॅस मध्यम आचेवर करून हे सर्व सुरणाचे काप लालसर तांबूस रंगाचे होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या.
७) सुरणाचे काप चांगले तळून घेतल्यावर झाऱ्याच्या साहाय्याने या कापांमधील तेल गाळून एका ताटात काढून घ्या. अशा प्रकारे गरमागरम, कुरकुरीत, तिखट आणि आंबटचिंबट असे चटपटीत सुरणाचे काप चपाती किंवा भाकरी यांसोबत खाण्यासाठी तयार होतील.

चव :

तिखट, आंबट आणि चवदार