मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

कोबी मटारची मसालेदार भाजी (कोबी, कोबीची भाजी कशी बनवायची, कोबीची भाजी बनवायची रेसिपी, कोबीची भाजी रेसिपी मराठी, कोबीची भाजी कशी बनवायची ते दाखवा, कोबीची भाजी कशी बनवतात ते दाखवा, कोबीची भाजी ची रेसिपी दाखवा, कोबीची भाजी बनवायची, कोबीची भाजी रेसिपी दाखवा, कोबीची भाजी कशी करायची ते दाखवा, कोबी मटार भाजी, मटार भाजी कशी बनवायची)

कोबी मटारची मसालेदार भाजी

कोबी मटारची मसालेदार भाजी (कोबी, कोबीची भाजी कशी बनवायची, कोबीची भाजी बनवायची रेसिपी, कोबीची भाजी रेसिपी मराठी, कोबीची भाजी कशी बनवायची ते दाखवा, कोबीची भाजी कशी बनवतात ते दाखवा, कोबीची भाजी ची रेसिपी दाखवा, कोबीची भाजी बनवायची, कोबीची भाजी रेसिपी दाखवा, कोबीची भाजी कशी करायची ते दाखवा, कोबी मटार भाजी, मटार भाजी कशी बनवायची)
कोबी मटारची मसालेदार भाजी

Links To Read Blog In Other Languages On Kobi Matarchi Masaledar Bhaji :

Blog On Kobi Matarchi Masaledar Bhaji In English

पदार्थाविषयी माहिती :

कोबी मटारची मसालेदार भाजी ही भाजी चवीला तिखट आणि फार चविष्ट असते. कोकण विभागात कोबीची भाजी बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. कोकणात कोबीची भाजी बनवताना त्यात काही वेळेस चवीसाठी बटाटा आणि तिखटासाठी मसाल्याऐवजी हिरवी मिरची, तर काही वेळेस भाजीमध्ये ओला मटार आणि भाजी तिखट बनवण्यासाठी त्यात मसाला आणि गरम मसाला वापरला जातो, तर काही वेळेस आवडीनुसार कोबीच्या भाजीची स्वादिष्टता वाढवण्यासाठी त्यात कोकणाची प्रमुख खासियत असलेले ओले खोबरे देखील घातले जाते. कोबी मटारच्या मसालेदार भाजीत जर ओले खोबरे घातले तर भाजीची चव आणखी वाढते. कोबीच्या भाजीचे अनेक फायदे आहेत, म्हणून कोबीची भाजी हा निरोगी आहाराचा एक प्रमुख स्रोत मानला जातो. कोबीच्या भाजीत पथ्यासंबंधित तंतुमय पदार्थ असतात, तसेच कॅल्शियम, व्हिटॅमिन बी ६ आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत करणारे व्हिटॅमिन सी यांचा चांगला समावेश असतो. कोबीच्या भाजीत कॅलरीचे प्रमाण फार कमी असून या भाजीत मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मँगनीज ही खनिजे देखील असतात. असंख्य फायदे असणारी कोबीची भाजी खाल्ल्याने पचनक्रिया आणि हृदयाचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होण्यास मदत होते, शिवाय मोतीबिंदू रोखण्यास मदत होते आणि मेंदूची शक्ती वाढते. कोबीच्या भाजीप्रमाणेच ओला मटारच्या भाजीचे देखील बरेच फायदे आहेत. बहुतेक लोकांना मटारची भाजी आणि त्यापासून बनवले जाणारे पदार्थ खाण्यासाठी जास्त आवडतात, त्यामुळे जर कोबीच्या भाजीत ओला मटार घातला तर भाजी अधिक रुचकर बनते. ओला मटार भाजीमध्ये तंतुमय पदार्थांचा समावेश असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते, तसेच पचनक्रिया सुधारते. मटार भाजीमध्ये अँटिऑक्सिडेन्ट आणि बरीच पोषक तत्वे असतात ज्यामुळे कर्करोगाला प्रतिबंध होतो. मटारमधील मॅग्नेशियम शरीरातील प्रतिरोधक क्षमता वाढवते आणि हृदयाचे स्वास्थ्य राखते. याशिवाय ओला मटार खाल्ल्याने शरीरातील वाढता कोलेस्टेरॉल नियंत्रित होण्यासाठी मदत होते. असंख्य गुणकारी फायदे असलेली कोबी मटारची मसालेदार भाजी हा पदार्थ कोकण विभागात विशेष प्रसिद्ध असून कोबी मटारची मसालेदार भाजी ही गरमागरम चपाती किंवा भाकरी यासोबत खाण्यासाठी बनवली जाते.    

विशेषता :

कोबी मटारची मसालेदार भाजी ही कोकण विभागात विशेष प्रसिद्ध असून गहूच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या चपाती सोबत किंवा तांदळाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवली जाते. कोबी मटारची मसालेदार भाजी या भाजीची विशेषता अशी आहे की या भाजीत मसाला आणि कोकणात प्रसिद्ध असलेला गरम मसाला वापरला जातो, त्यामुळे भाजी अतिशय चटपटीत आणि उत्कृष्ट बनते. तसेच ही भाजी चवीला तिखट असल्यामुळे ज्यांना तिखट आणि मसालेदार भाज्या खाण्यासाठी आवडतात त्यांच्यासाठी कोबी मटारची मसालेदार भाजी हा भाजीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. या भाजीत टोमॅटोचा वापर केला जातो, त्यामुळे भाजीला किंचित आंबट चव येऊन ओल्या मटार भाजीचा उग्रपणा निघून जातो. आपल्या आवडीनुसार आपण कोबीच्या भाजीत ओला मटार भाजीबरोबरच बटाटा देखील घालू शकतो, भाजीतील बटाटा भाजीची चव अधिक वाढवतो. 

साहित्य :

१) तेल
२) मोहरी
३) सात ते आठ कढीपत्त्याची पाने
४) जिरे
५) बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा
६) एक बारीक चिरलेला कांदा
७) दोन बारीक चिरलेले टोमॅटो  
८) हळद
९) मसाला
१०) गरम मसाला
११) मीठ
१२) एक मोठा कोबी
१३) एक वाटी ओला मटार
१४) कोथिंबीर 

कृती :

१) कोबी मटारची मसालेदार भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम भाजी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जवळ तयार ठेवा. पहिल्यांदा एक मोठा कोबी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून कोबीच्या भाजीला असणारी माती निघून जाईल. नंतर हा मोठा कोबी एका ताटामध्ये विळीवर किंवा सुरीच्या साहाय्याने बारीक चिरून घ्या. नंतर एका टोपात पाणी घेऊन त्यात बारीक चिरून घेतलेली ही कोबीची भाजी आणि एक वाटी ओला मटार भिजत ठेवा, असे केल्याने कोबीची भाजी आणि ओला मटार हवेत आळणार नाही आणि पाण्यात भाजी चांगली ताजी राहील.
२) कोबी चिरून घेतल्यावर कोबी मटारची मसालेदार भाजी बनवण्याचे काम अगदी सोपे होऊन जाते.
३) त्यानंतर भाजी बनवण्यासाठी गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा, कढई चांगली तापल्यानंतर त्यात सहा ते सात चमचे तेल घाला, मग गॅस मंद आचेवर करून त्यात अर्धा चमचा मोहरी घाला, मोहरी तेलात व्यवस्थित तडतडल्यावर फोडणीत मोहरीचा खूप छान सुगंध दरवळेल, मग त्यात अर्धा चमचा जिरे आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाने घाला. फोडणीत मोहरी, जिरे आणि कढीपत्ता व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात लगेचच बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा घाला.
४) तेलात ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घेतल्यावर फोडणीत आल्याचा हलकासा सुगंध येईल. त्यानंतर या फोडणीत एक बारीक चिरलेला कांदा घाला.
५) कढईतील ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या, तेलात कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. कांदा लालसर होईस्तोवर दुसऱ्या बाजूला टोपातील पाण्यात भिजत ठेवलेली कोबीची भाजी आणि ओला मटार पाण्यात व्यवस्थित धुवून त्यातील पाणी काढून टाका.
६) कांदा तेलात लालसर झाल्यानंतर त्यात चिमूटभर हळद, दोन चमचे मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घाला. (नोंद : ज्यांना कमी तिखट पदार्थ खायला आवडतात, त्यांच्यासाठी आवडीनुसार कमी तिखटासाठी भाजीतील फोडणीत दोन चमचे यांपेक्षा कमी मसाला आणि अर्धा चमचापेक्षा कमी गरम मसाला घालता येऊ शकतो. ) यानंतर लगेचच भांड्यातील पाणी काढून घेतलेली बारीक चिरलेली कोबीची भाजी आणि ओला मटार फोडणीत घाला. कोबीची भाजी आणि ओला मटार घालताना त्यात अजिबात पाणी असणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण कोबी मटारची मसालेदार भाजी ही वाफेवर व्यवस्थित शिजेल, त्यामुळे कोबी मटारची मसालेदार भाजी शिजवण्यासाठी त्यात अजिबात पाणी घालू नका.
७) मग त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व भाजी व्यवस्थित परतून घ्या म्हणजे सर्व फोडणी, फोडणीतील हळद, मसाला, गरम मसाला आणि मीठ हे सर्वत्र भाजीला व्यवस्थित लागेल. पुढे गॅस मध्यम आचेवर करून कोबी मटारची मसालेदार भाजी शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवा. मग तीन ते चार मिनिटांनी काळजीपूर्वक कढईवरील झाकण काढून बघा, भाजीला पाणी सुटले असेल याचा अर्थ कोबीची भाजी आणि मटार अजून शिजलेले नाहीत म्हणून कोबी मटारची मसालेदार भाजी चमचाच्या साहाय्याने व्यवस्थित परतून घ्या. नंतर त्यात वरून दोन बारीक चिरलेले टोमॅटो घाला आणि भाजी वाफेवर शिजण्यासाठी पुन्हा कढईवर झाकण ठेवा.
८) यानंतर गॅस मंद आचेवर करून घ्या, कारण कोबी मटारची मसालेदार भाजी वाफेवर शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही, जर गॅस मध्यम आचेवर करून भाजी शिजवली तर ती करपून जाण्याची शक्यता असते. यासाठी मंद आचेवर भाजी शिजण्यासाठी ठेवून द्या. नंतर पाच ते सहा मिनिटांंनंतर काळजीपूर्वक कढईवरील झाकण काढून बघा, भाजीतील टोमॅटो शिजून नरम झालेला दिसेल आणि भाजीत टॉमॅटो घातल्यामुळे किंचित पाणी सुटले असेल, मग ही भाजी व्यवस्थित ढवळून घ्या म्हणजे टॉमॅटो भाजीत सर्वत्र व्यवस्थित लागेल. यानंतर कढईवर झाकण ठेवून भाजी चार ते पाच मिनिटांसाठी पुन्हा वाफेवर शिजण्यासाठी ठेवून द्या. चार ते पाच मिनिटांनंतर झाकण उघडून पाहिले तर भाजीतील कोबी आणि ओला मटार हा नरम झालेला दिसेल कारण कोबी आणि मटारची भाजी वाफेवर पटकन शिजते. भाजी शिजली आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी भाजीतील मटार बोटाने दाबून बघा, जर तो सहज दाबला गेला तर भाजी शिजली आहे याची खात्री करून घेता येईल. कोबी आणि मटार व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करा आणि मग भाजीवर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घाला.
९) अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये कोबी मटारची खमंग, मसालेदार आणि चविष्ट अशी भाजी गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तयार होईल.

चव :

चटपटीत आणि मसालेदार