मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

तूरीच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ (तूर डाळ, तुरीची डाळ, तुरीची डाळ कशी बनवायची, तुरीची डाळ खाण्याचे फायदे, तुरीची डाळ कशी बनवतात, तुरीची डाळ कशी करावी, तुरीची डाळ कशी बनवावी, तुरीची डाळ बनवण्याची पद्धत, तुरीची डाळ कसे बनवतात, तिखट डाळ, तिखट डाळ कशी बनवायची, तिखट डाळ बनवायची रेसिपी, तिखट तुरीची डाळ)

तूरीच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ

तूरीच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ (तूर डाळ, तुरीची डाळ, तुरीची डाळ कशी बनवायची, तुरीची डाळ खाण्याचे फायदे, तुरीची डाळ कशी बनवतात, तुरीची डाळ कशी करावी, तुरीची डाळ कशी बनवावी, तुरीची डाळ बनवण्याची पद्धत, तुरीची डाळ कसे बनवतात, तिखट डाळ, तिखट डाळ कशी बनवायची, तिखट डाळ बनवायची रेसिपी, तिखट तुरीची डाळ)
तुरीच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ

Links To Read Blog In Other Languages On Turichya Dalipasun Banavleli Tikhat Dal :

Blog On Turichya Dalipasun Banavleli Tikhat Dal In English

पदार्थाविषयी माहिती :

तूरीच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ हा पदार्थ चवीला तिखट असून ही डाळ गरमागरम भातासोबत, चपातीसोबत खाण्यासाठी फारच छान लागते. कोकण विभागात तूरीची डाळ तिखट बनवण्यासाठी त्यात हिरव्या मिरच्यांऐवजी मसाला आणि गरम मसाला वापरला जातो. मसाला आणि गरम मसाला वापरल्यामुळे तूरीच्या तिखट डाळीला खूपच उत्कृष्ट रंग येऊन डाळीचा स्वाद अधिक वाढतो. कोकण विभागात घराघरात जेवणामध्ये भातासोबत खाण्यासाठी तूरीच्या डाळीपासून तिखट डाळ बनवली जाते. तूरीच्या डाळीत भरपूर प्रमाणात प्रथिने, कर्बोदके आणि तंतुमय पदार्थ असतात, त्यामुळे शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी तूरीच्या डाळीचा आहारात समावेश करणे हे फार महत्वाचे आहे. म्हणूनच भारतात तूर डाळ हे भारतीयांच्या आहारातील अतिशय महत्वाचे धान्य मानले जाते. तूरीची डाळ ही चवीला उग्र असल्यामुळे तूरीच्या डाळीपासून बनवल्या जाणाऱ्या तिखट डाळीचा उग्रपणा कमी करण्यासाठी त्यात टोमॅटो, लसूण आणि कोकम यांचा योग्य प्रमाणात वापर केला जातो. कोकणात तूरीच्या डाळीचे गोडे, तिखट असे वरण गरमागरम भातासोबत खाण्यासाठी बनवले जाते, त्यामुळे तूरीची डाळ ही कोकण विभागात फार प्रसिद्ध आहे.      

विशेषता :

तूरीच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ या पदार्थाची मुख्य विशेषता अशी आहे की ज्यांना भातासोबत खाण्यासाठी गोडी डाळ आवडत नाही, त्यांच्यासाठी तूरीच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ हा पदार्थ डाळीचा उत्तम बेत ठरू शकतो. तूरीच्या तिखट डाळीत टोमॅटो घातल्यामुळे डाळीचा उग्रपणा कमी होऊन हलका आंबटपणा येतो, पण कोकण विभागात डाळीची आंबट चव किंचित वाढवण्यासाठी त्यात योग्य प्रमाणात कोकम घातले जातात. जेवणात आंबट चवीसाठी कोकमाचा वापर ही कोकणाची खासियत आहे. डाळीत कोकम घातल्यामुळे डाळ आणखी रुचकर बनते. बहुतेक लोकांना तिखट आंबट अशी मिश्र चव असणारे पदार्थ खाण्यासाठी फार आवडतात, त्यामुळे कोकणात प्रसिद्ध असणाऱ्या तूरीच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ ही बहुतेक लोकांची आवडती डाळ ठरू शकते.  

साहित्य :

१) तेल
२) मोहरी
३) सात ते आठ कढीपत्त्याची पाने
४) जिरे
५) बारीक कापून घेतलेल्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या
६) बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा
७) हिंग
८) हळद
९) मसाला
१०) गरम मसाला
११) दोन बारीक चिरलेले कांदे
१२) दोन बारीक चिरलेले टोमॅटो
१३) कोकम
१४) मीठ
१५) दोन वाटी तूरीची डाळ
१६) पाणी
१७) कोथिंबीर

कृती :

१) तूरीच्या डाळीपासून तिखट डाळ बनवण्यासाठी पहिल्यांदा दोन वाटी तूरीची डाळ पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका कूकर मध्ये ही धुवून घेतलेली तूरीची डाळ घ्या, त्यात दोन बारीक चिरलेले टोमॅटो घाला. दोन वाटी डाळ घेतल्यामुळे ही डाळ शिजवण्यासाठी कूकर मध्ये अडीज ग्लास पाणी घाला. तूरीची डाळ चवीला उग्रट असल्यामुळे डाळ शिजवताना त्यात टोमॅटो घातला जातो, त्यामुळे डाळीचा उग्रपणा कमी होऊन डाळीला किंचित आंबट चव येते. मग कूकरचे झाकण लावून गॅस चालू करून त्यावर कूकर ठेवा आणि तूरीची डाळ शिजवण्यासाठी कूकरच्या चार शिट्या काढून घ्या.
२) कूकरच्या चार शिट्या काढून घेतल्यानंतर गॅस बंद करा आणि मग पाच ते सात मिनिटांनी कूकरची शिटी चमचाच्या साहाय्याने वर करून त्यातील वाफ काढून घ्या आणि वाफ निघाल्यानंतर कूकरचे झाकण उघडा.
३) अशा पद्धतीने तूरीची डाळ व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठा टोप ठेवा, टोप व्यवस्थित तापल्यानंतर त्यात सात ते आठ चमचे तेल घाला, अर्धा चमचा मोहरी घाला. तेलात मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर गॅस मंद आचेवर करून त्यात सात ते आठ कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचे जिरे, चिमुटभर हिंग घाला. फोडणीत मोहरी, कढीपत्ता, जिरे आणि हिंग यांचा सुगंध येताच त्यात बारीक कापून घेतलेल्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आणि बारीक कापून घेतलेले आले घाला. ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या.
४) त्यानंतर या फोडणीत दोन बारीक चिरलेले कांदे घाला, कांदा तेलात लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या.
५) कांदा लालसर झाल्यानंतर फोडणीत अर्धा चमचा हळद घाला. तूरीच्या तिखट डाळीत हळद घातल्यामुळे तूरीच्या डाळीला हळदीचा सुंदर स्वाद आणि हलका पिवळसर रंग येईल. त्यानंतर या फोडणीत दोन चमचे मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घाला. फोडणीतील मसाला आणि गरम मसाला करपून जाऊ नये म्हणून त्यात लगेचच अर्धा कप पाणी घाला. फोडणीत किंचित पाणी घातल्यामुळे त्याला त्वरित उकळी फुटेल.
६) त्यानंतर या टोपातील फोडणीत कूकर मधील तूरीची शिजवून घेतलेली डाळ घाला, नंतर त्यात चवीनुसार मीठ घाला आणि तूरीची डाळ फार घट्ट आणि जास्त पातळ होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार तूरीच्या डाळीत पाणी घाला. यानुसार तूरीची डाळ व्यवस्थित ढवळून घ्या, जेणेकरुन डाळीत सर्व फोडणी आणि मीठ सर्वत्र बरोबर लागेल. तूरीच्या तिखट डाळीचा उग्रपणा किंचित कमी करण्यासाठी आपण त्यात टोमॅटो घातला, परंतु तिखट डाळीतील उग्रता पूर्ण घालवण्यासाठी आणि डाळीला आंबटपणा येण्यासाठी त्यात चार ते पाच कोकम घाला, त्यामुळे तूरीच्या डाळीची चव दुप्पटीने आणखी वाढेल. तूरीच्या डाळीत हिरव्या मिरच्यांऐवजी मसाला आणि गरम मसाला वापरल्यामुळे डाळीला तिखट चव येऊन डाळ अधिकच उत्कृष्ट आणि मसालेदार बनेल.
७) मग गॅस किंचित वाढवून घ्या आणि तूरीच्या डाळीत चमचा उलटा करून घालून ठेवा. (नोंद : डाळीत चमचा उलटा करून ठेवल्याने डाळीला उकळी आल्यावर डाळ ओतू जाणार नाही. ) अशा तऱ्हेने तूरीची डाळ पाच ते दहा मिनिटे उकळी येण्यासाठी ठेवून द्या. तूरीच्या डाळीला उकळी येण्यास सुरुवात होऊन तूरीच्या डाळीचा सुगंध दरवळेल. एकदा का तूरीच्या डाळीला व्यवस्थित उकळी येऊन डाळ शिजली की काळजीपूर्वक डाळीतील चमचा रुमालाच्या साहाय्याने बाहेर काढून गॅस बंद करा आणि मग डाळीवर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घाला.
८) यानुसार तूरीची मसालेदार आणि पौष्टिक अशी गरमागरम तिखट डाळ मऊ आणि लुसलुशीत भातासोबत खाण्यासाठी तयार होईल.

चव :

कोकमामुळे किंचित आंबट पण मसाल्यामुळे तिखट आणि स्वादिष्ट