मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

शेगुलाची भाजी (शेवग्याच्या पानांची भाजी)

शेगुलाची भाजी

शेगुलाची भाजी (शेवग्याच्या पानांची भाजी)
शेगुलाची भाजी

Links To Read Blog In Other Languages On Shegulachi Bhaji :

Blog On Shegulachi Bhaji In English

पदार्थाविषयी माहिती :

शेगुलाची भाजी हा बहुतकरून कोकण भागात तांदळाची भाकरी किंवा नाचणीची भाकरी यासोबत खाण्यासाठी बनवला जाणारा अतिशय चविष्ट पदार्थ आहे. गरमागरम भाकऱ्यांसोबत शेगुलाची भाजी फार उत्कृष्ट लागते. शेगुलाची भाजी ही जास्त करून पावसाळ्याच्या मोसमात अधिक प्रमाणात विकली जाते, खरे पाहता बारा मास शेगुलाची भाजीचे उत्पन्न असते, परंतु हिवाळ्यात शेगुलाच्या पानांची झड होते. घरोघरी गृहिणी नाश्त्याला किंवा जेवणासाठी देखील भाकऱ्यांसोबत शेगुलाची भाजी बनवू शकतात.   

विशेषता :

शेगुलाच्या भाजीची विशेषता अशी आहे की गणेशोत्सवात गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये कोकणात गौरीची भेट म्हणून गृहिणी तांदळाच्या, नाचणीच्या भाकरीसोबत किंवा तांदूळ आणि नाचणी मिश्रित पिठाच्या भाकरीसोबत शेगुलाची भाजी बनवतात आणि घरोघरी जाऊन शेगुलाची भाजी आणि भाकरी अशा पद्धतीची गौरी भेट म्हणून देतात. कोकणात बनवल्या जाणाऱ्या चुलीवरच्या भाकरी भाजीची चव ही अगदी वेगळीच असते म्हणूनच कोकणात शेगुलाची भाजी आणि भाकरी हा पदार्थ इतर पदार्थांसोबत विशेष लोकप्रिय आहे.    

साहित्य :

१) तेल
२) सात ते आठ कढीपत्त्याची पाने
३) दोन बारीक चिरलेले कांदे
४) मीठ
५) दोन ते तीन भाग करून घेतलेल्या चार हिरव्या मिरच्या
६) शेगुलाची भाजी (१ जुडी)
७) एक वाटी ओले खोबरे

कृती :

१) सर्वप्रथम शेगुलाची भाजीच्या (१ जुडी) देठांची सर्व पाने एका मोठ्या परातीत किंवा भांड्यात वेगळी करू घ्या. शेगुलाच्या साफ केलेल्या भाजीत बारीक देठ किंवा शिग्रे असल्यास ती शेगुलाच्या पानांपासून वेगळी काढून व्यवस्थित साफ करून घ्या.
२) शेगुलाची साफ केलेली भाजी पाण्यात स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून टाकावे. 
३) साफ करून घेतलेली शेगुलाची भाजी पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही भाजी विळीच्या साहाय्याने किंवा सुरीने (जसे शक्य असेल तसे) बारीक चिरून घ्यावी. 
४) नंतर गॅसवर एक मोठा टोप किंवा खोलगट तवा ठेवा. त्या टोपात चार ते पाच चमचे तेल घाला. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात दोन ते तीन भाग करून घेतलेल्या चार हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाने घाला. गॅस लगेच मंद आचेवर करून घ्या, जेणेकरून तेलात घातलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता करपू नये. नंतर या फोडणीत दोन बारीक चिरलेले कांदे घाला. ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या. कांदा लालसर होईपर्यंत तेलात व्यवस्थित भाजून घ्या. 
५) कांदा तेलात लालसर झाल्यानंतर त्यात शेगुलाची बारीक चिरलेली आणि पाणी काढून घेतलेली भाजी घाला. भाजी घालताना त्यात पाणी असणार नाही याची विशेष काळजी घ्या. नंतर भाजीत चवीनुसार मीठ घाला आणि भाजी व्यवस्थित ढवळून घ्या, जेणेकरून भाजीत सर्वत्र मीठ अगदी बरोबर लागेल. 
६) त्यानंतर गॅस मंद आचेवरच ठेवून टोपाच्या तोंडावर झाकण ठेवून शेगुलाची भाजी वाफेवर पाच ते दहा मिनिटे शिजवून घ्या. शेगुलाची भाजी शिजण्यासाठी ठेवल्यावर तिला आपोआपच पाणी सुटेल आणि वाफेवर ती अगदी उत्तम रित्या शिजेल, त्यामुळे ती शिजवण्यासाठी त्यात अजिबात पाणी घालू नका. शेगुलाची भाजी शिजताना त्यात चरचर असा आवाज देखील होईल, त्यावरून आपणांस हे लक्षात येईल की शेगुलाची भाजी अजूनही शिजत आहे.    
७) शेगुलाची भाजी बनवताना ती पटकन होण्यासाठी आपण गॅस किंचित वाढवू शकतो, परंतु ती करपून जाण्याची शक्यता जास्त असते. कारण सर्व गृहिणींना हे ठाऊकच असेल की वाफेवर कोणतीही भाजी अगदी पटकन शिजते. शेगुलाची भाजी व्यवस्थित चरचरली की त्यातील पाणी निघून जाते, त्यामुळे एकदा भाजी शिजली की त्यातून भाजी चरचरण्याचा आवाज येणार नाही.
८) शेगुलाची भाजी शिजल्यानंतर त्यात वरून बारीक कातलेले एक वाटी ओले खोबरे घाला आणि शेगुलाची भाजी व्यवस्थित ढवळून गॅस बंद करा. अशा प्रकारे गरमागरम, सुरेख आणि झटापट होणारी अशी शेगुलाची भाजी भाकरीसोबत खाण्यास तयार होईल.            

चव : 

खमंग, मिरचीमुळे तिखट पण ओल्या खोबऱ्यामुळे किंचित गोड आणि चविष्ट