मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

उकडलेले पौष्टिक मूग (मुगाचे फायदे, मूग खाण्याचे फायदे, मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते)

उकडलेले पौष्टिक मूग 

उकडलेले पौष्टिक मूग (मुगाचे फायदे, मूग खाण्याचे फायदे, मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते)
उकडलेले पौष्टिक मूग

Links To Read Blog On Ukadlele Paushtik Moog In Other Languages :

Blog On Ukadlele Paushtik Moog In English

पदार्थाविषयी माहिती :

उकडलेले पौष्टिक मूग या पदार्थाच्या नावावरून आपल्या सर्वांच्या हे अगदी सहजपणे लक्षात येईल की हा पदार्थ नावाप्रमाणे पौष्टिक असेल. सध्याच्या काळात कामाचा अतिरिक्त ताण असलेल्या लोकांनी उकडलेले पौष्टिक मूग हा कोकण प्रांतातील प्रसिद्ध पदार्थ जरूर खाल्ला पाहिजे. उकडलेले पौष्टिक मूग हा फार त्वरित होणारा पदार्थ असून मूग हे कडधान्य शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि जर मोड आलेले मूग असतील तर ते शरीरासाठी अधिकच फायदेशीर ठरतात. मूग या कडधान्यामध्ये जास्त प्रमाणत पोषक तत्वे असतात, ताप आलेल्या व्यक्तीस जर उकडलेले मूग खाऊ घातले तर त्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होऊन शरीरास ऊर्जा मिळते. स्थूलपणा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मूग खाणे हे अतिशय उपयुक्त आहे. अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी मूग किंवा त्यापासून बनवले जाणारे पदार्थ देखील लाभदायक ठरतात. उकडलेले मूग खाल्ल्याने शरीराची पचनक्षमता सुधारण्यासाठी मदत होते. तसेच मूग खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, रक्ताची पातळी देखील नियंत्रणात राहते आणि पोटाचे विविध आजार देखील कमी होतात. गर्भधारणेत जर उकडलेल्या मुगाचे सेवन केले तर बाळाच्या आईला आणि नवजात बाळाला देखील त्याचा लाभ होतो आणि आईच्या पोटातील बाळाची वाढ देखील व्यवस्थित होते. उकडलेले मूग खाण्याचे बरेच फायदे आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील कोकणात विशेष प्रसिद्ध असणाऱ्या या पौष्टिक पदार्थाचा आपल्या आहारात समावेश करणे फार आवश्यक आहे.

विशेषता :

उकडलेले पौष्टिक मूग या पदार्थाची प्रमुख विशेषता म्हणजे या पदार्थाचा पौष्टिकपणा आणि पदार्थाची चव होय. कोकण प्रांतात उकडलेले मूग हे मोठ्या आवडीने खाल्ले जातात, कारण शरीर स्वास्थ्यासाठी ते फार पोषक असतात. याशिवाय हा पदार्थ बनवण्यासाठी अतिशय सोपा असून घरात उपलब्ध असलेल्या कांदा, टोमॅटो या भाज्यांचा वापर यात केला जातो. तसेच हा पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी त्यात मसाला, मीठ घातल्यामुळे या पदार्थाची चव अधिक रुचकर लागते. कोकण प्रांतात ओले खोबरे हे बहुतेक सर्वच पदार्थांमध्ये वापरले जाते आणि उकडलेले पौष्टिक मूग यात कातलेले ओले खोबरे घातल्यामुळे पदार्थाचा स्वाद आणखी वाढतो.

साहित्य :

१) तेल
२) सात ते आठ कढीपत्त्याची पाने
३) दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
४) हिंग
५) हळद
६) दोन वाटी मोड आलेले मूग
७) एक बारीक चिरलेला कांदा
८) दोन बारीक चिरलेले टोमॅटो
९) मसाला
१०) मीठ
११) अर्धा वाटी कातलेले ओले खोबरे
१२) कोथिंबीर

कृती :

१) उकडलेले पौष्टिक मूग बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा एक छोटा कुकर घ्या.
२) गॅस चालू करून त्यावर हा छोटा कुकर ठेवा, गॅस मध्यम आचेवर करून घ्या, मग कुकरमध्ये चार ते पाच चमचे तेल घाला.
३) तेल व्यवस्थित गरम झाल्यावर गॅस मंद आचेवर करून त्यात सात ते आठ कढीपत्त्याची पाने, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिमुटभर हिंग आणि चिमुटभर हळद घाला.
४) फोडणी व्यवस्थित परतून घ्या. तेलात कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या व्यवस्थित भाजल्यानंतर त्यातून कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, हिंग, हळद यांचा खमंग सुवास येईल.
५) त्यानंतर या फोडणीत दोन वाटी मोड आलेले मूग घाला. मूग शिजवण्यासाठी त्यात एक वाटी पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या जेणेकरून तेलातील फोडणी आणि मीठ सर्वत्र बरोबर लागेल.
६) मग काळजीपूर्वक कुकरचे झाकण बंद करून मध्यम आचेवर कूकरची एक शिटी काढून घ्या. कारण कूकरच्या एका शिटीमध्ये मूग पटकन शिजतात.
७) कूकरची एक शिटी काढून घेतल्यावर गॅस बंद करा. पाच ते सात मिनिटानंतर कूकरची शिटी चमचाच्या मदतीने वर करून कूकरमधील वाफ काढून टाका आणि वाफ निघाल्यानंतर कूकरचे झाकण उघडा. एका मोठ्या वाटीमध्ये उकडवून घेतलेले हे सर्व मूग काढून घ्या. नंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा, दोन बारीक चिरलेले टोमॅटो, एक चमचा मसाला आणि कांदा, टोमॅटो याला मीठ लागण्यासाठी त्यात चवीनुसार थोडे अंदाजे मीठ घाला. कोकणात उकडलेले मूग या पदार्थाची चव द्विगुणित करण्यासाठी त्यामध्ये कातलेले ओले खोबरे घातले जाते, म्हणून यात अर्धा वाटी कातलेले ओले खोबरे घाला आणि त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित ढवळून घ्या.
८) अशा पद्धतीने फार कमी वेळात ओल्या खोबऱ्यामुळे किंचित गोड, मसाल्यामुळे तिखट आणि टोमॅटोमुळे काहीसे आंबट अशा मिश्र चवीचे पौष्टिक गरमागरम उकडलेले मूग खाण्यासाठी तयार होतील.

चव :

किंचित गोड, आंबट, तिखट, पौष्टिक आणि चविष्ट