वांग बटाट्याची मसालेदार भाजी (वांग बटाटा भाजी, वांग बटाटा भाजी रेसिपी, वांग बटाटा सुकी भाजी, वांग्याची भाजी कशी बनवतात, वांग्याची भाजी कशी करायची, वांग्याची भाजी रेसिपी, वांगी भाजी, वांग्याची सुकी भाजी रेसिपी)
वांग बटाट्याची मसालेदार भाजी
Links To Read Blog In Other Languages On Wang Batatyachi Masaledar Bhaji :
पदार्थाविषयी माहिती :
वांग बटाट्याची मसालेदार भाजी हा पदार्थ चवीला तिखट आणि चवदार असतो. कोकण विभागात वांग बटाट्याची मसालेदार भाजी ही तांदळाच्या किंवा नाचणीच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या भाकरीसोबत किंवा गहूच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या चपातीसोबत खाण्यासाठी बनवली जाते. वांग म्हटलं तर बहुतेक सर्व जण नाक मुरडतात कारण वांग्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही, म्हणून जर वांग्याची भाजी बनवताना त्यात बटाटा घातला तर तीच भाजी सर्वजण आवडीने खातात. भाजीतील मीठ, मसाला आणि कोकण विभागात प्रसिद्ध असलेला जेवणात वापरला जाणारा गरम मसाला यामुळे भाजीची चव अधिक वाढते. कोकणात वांग बटाट्याची भाजी ही वाटण (कोकणात वाटण म्हणजे वाटप) घालून देखील बनवली जाते, वाटण घातल्यामुळे भाजीची चव आणखी उत्कृष्ट लागते. कोकण विभागात वांग बटाट्याच्या भाजीत वाटण न घालता बनवली जाणारी भाजी ही वांग बटाट्याची मसालेदार भाजी म्हणून प्रसिद्ध जाते.
विशेषता :
वांग बटाट्याची मसालेदार भाजी या पदार्थाची मुख्य विशेषता अशी आहे की या भाजीत केवळ वांग आणि बटाटा या भाज्यांचा वापर केला जातो, त्यामुळे इतर कोणतीही भाजी घेताना होणारा अतिरिक्त खर्च वाचतो. घरात उपलब्ध असलेले मसाले आणि जिन्नस वापरून वांग बटाट्याच्या भाजीची स्वादिष्टता अधिक वाढवता येऊ शकते. वांग बटाट्याची मसालेदार भाजी ही वाफेवर लवकर शिजते, त्यामुळे ही भाजी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही. वेळेची कमतरता असल्यास अत्यंत कमी वेळेत होणारी वांग बटाट्याची मसालेदार भाजी ही नाश्त्याचा किंवा जेवणाचा उत्तम आणि रुचकर बेत ठरू शकतो.
साहित्य :
१) तेल
२) मोहरी
३) सात ते आठ कढीपत्त्याची पाने
४) चार ते पाच बारीक कापून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या
५) बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा
६) एक बारीक चिरलेला कांदा
७) हळद
८) मसाला
९) गरम मसाला
१०) मीठ
११) चार ते पाच वांगी
१२) सात ते आठ बटाटी
१३) कोथिंबीर
कृती :
१) वांग बटाट्याची मसालेदार भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम भाजी बनवण्याकरिता आवश्यक ते सर्व साहित्य तयार ठेवा. पहिल्यांदा चार ते पाच वांगी आणि सात ते आठ बटाटी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून वांग्यांला असणारी आणि बटाट्यांच्या सालीला असणारी माती निघून जाईल. नंतर चार ते पाच वांग्यांचे देठ काढून त्यांच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. नंतर सोलण्याच्या साहाय्याने सात ते आठ बटाट्यांची साल काढून बटाट्यांच्या देखील मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. एका टोपात पाणी घेऊन त्यात ही कापलेली वांगी आणि बटाटी भिजत ठेवा, असे केल्याने वांगी आणि बटाटी यांच्या कापलेल्या फोडींचा रंग लालसर होणार नाही, शिवाय बटाट्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल.
२) वांगी आणि बटाटी यांच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्यावर वांग बटाट्याची मसालेदार भाजी बनवण्याचे काम अगदी सोपे होऊन जाते.
३) त्यानंतर भाजी बनवण्यासाठी गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा, कढई चांगली तापल्यानंतर त्यात दहा ते बारा चमचे तेल घाला, मग गॅस मंद आचेवर करून त्यात अर्धा चमचा मोहरी घाला, मोहरी तेलात व्यवस्थित तडतडल्यावर फोडणीत मोहरीचा खूप छान सुगंध दरवळेल, मग त्यात सात ते आठ कढीपत्त्याची पाने घाला. फोडणीत मोहरी, कढीपत्ता व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात लगेचच चार ते पाच बारीक कापून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या आणि बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा घाला.
४) तेलात ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घेतल्यावर फोडणीत लसणीच्या पाकळ्यांचा आणि आल्याचा हलकासा सुगंध येईल. त्यानंतर या फोडणीत एक बारीक चिरलेला कांदा घाला.
५) कढईतील ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या, तेलात कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. कांदा लालसर होईस्तोवर दुसऱ्या बाजूला टोपातील पाण्यात भिजत ठेवलेल्या वांगी आणि बटाटी यांच्या फोडींमधील पाणी काढून टाका.
६) कांदा तेलात लालसर झाल्यानंतर त्यात चिमूटभर हळद, दोन चमचे मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घाला. (नोंद : ज्यांना कमी तिखट पदार्थ खायला आवडतात, त्यांच्यासाठी आवडीनुसार कमी तिखटासाठी भाजीतील फोडणीत दोन चमचे यांपेक्षा कमी मसाला आणि अर्धा चमचापेक्षा कमी गरम मसाला घालता येऊ शकतो. ) यानंतर लगेचच टोपातील पाणी काढून घेतलेल्या वांगी आणि बटाटी यांच्या फोडी या फोडणीत घाला. फोडी घालताना त्यात अजिबात पाणी असणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण वांग बटाट्याची मसालेदार भाजी ही वाफेवर व्यवस्थित शिजेल, त्यामुळे भाजी शिजवण्यासाठी त्यात अजिबात पाणी घालू नका.
७) मग त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व भाजी व्यवस्थित परतून घ्या म्हणजे सर्व फोडणी, फोडणीतील हळद, मसाला आणि गरम मसाला, मीठ हे सर्वत्र फोडींना व्यवस्थित लागेल. पुढे गॅस मध्यम आचेवर करून वांग बटाट्याची मसालेदार भाजी शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवा. मग तीन ते चार मिनिटांनी काळजीपूर्वक कढईवरील झाकण काढून बघा, भाजीला पाणी सुटले असेल याचा अर्थ वांगी आणि बटाटी यांच्या फोडी अजून शिजलेल्या नाहीत म्हणून वांग बटाट्याची भाजी चमचाच्या साहाय्याने व्यवस्थित परतून घ्या. नंतर भाजी वाफेवर शिजण्यासाठी पुन्हा कढईवर झाकण ठेवा.
८) यानंतर गॅस मंद आचेवर करून घ्या, कारण वांग बटाट्याची मसालेदार भाजी वाफेवर शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही, जर गॅस मध्यम आचेवर करून भाजी शिजवली तर ती करपून जाण्याची शक्यता असते. यासाठी मंद आचेवर भाजी शिजण्यासाठी ठेवून द्या. नंतर पाच ते दहा मिनिटांंनंतर काळजीपूर्वक कढईवरील झाकण काढून बघा, भाजीतील पाणी निघून गेले असेल आणि भाजीचा खमंग सुवास येईल, भाजीतील वांगे हे वाफेवर पटकन शिजते त्यामुळे ते नरम झालेले दिसेल, तसेच भाजीतील वांग्यांच्या आणि बटाट्यांच्या फोडीत चमचा उभा खुपसून वांगे आणि बटाटे शिजले आहे की नाही याची खात्री करून बघा. जर वांगे आणि बटाटे सहजतेने कापले गेले तर भाजी व्यवस्थित शिजली आहे, अशी खात्री करून घेता येईल. वांगे आणि बटाटे व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करा आणि मग भाजीवर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घाला.
९) अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये वांग बटाट्याची गरमागरम, तिखट आणि खमंग अशी चविष्ट भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तयार होईल.
चव :
तिखट आणि चवदार