मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

अळू वडी (अळू वडी, अळू वडी इन मराठी, अळू वडी ची रेसिपी दाखवा, अळू वडी रेसिपी मराठी, अळू वडी फायदे)

अळू वडी

अळू वडी (अळू वडी, अळू वडी इन मराठी, अळू वडी ची रेसिपी दाखवा, अळू वडी रेसिपी मराठी, अळू वडी फायदे)
अळू वडी

Links To Read Blogs In Other Languages On Aloo Wadi :

Blog On Aloo Wadi In English

पदार्थाविषयी माहिती : 

अळू वडी हा फक्त कोकणात नव्हे तर बहुतेक ठिकाणी बनवला जाणारा विशेष पदार्थ आहे. अळू वडी हा पदार्थ बहुतांश ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. काही ठिकाणी गोड, काही ठिकाणी फक्त तिखट, तर काही ठिकाणी नुसता अळूच्या गुंडाळींना उकडवून त्यावर राई, जिरे, कडीपत्ता, हिरवी मिरची याची झणझणीत फोडणी देऊन अळू वडीचा आस्वाद अधिकाधिक वाढवला जातो. मात्र कोकणामध्ये अळू वडी ही अत्यंत साध्या सोप्या तऱ्हेने आणि मोठ्या सहजतेने बनवली जाते, जी खाण्यासाठी अतिशय चटकदार, खमंग आणि कुरकुरीत अशा धाटणीची असते. कोकणातील गावांमध्ये अळूची पाने ही अधिक प्रमाणात पावसाळ्याच्या हंगामात पाहायला मिळतात, त्यामुळे अळू वडी हा गरमागरम पदार्थ पावसाळ्याच्या थंडगार मोसमात खायला अधिक आनंददायी वाटतो.            

विशेषता :

अळूची पाने ही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त उगवतात, त्यामुळे घरोघरी अळूच्या वड्यांचा गरमागरम बेत केला जातो. गणेशोत्सव हा गणपती बाप्पाचा उत्सव पावसाळ्याच्या ऋतूत येतो, त्यामुळे कोकणात गावागावातल्या घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवात बाप्पासाठी बनवल्या जाणाऱ्या मोदकाच्या नैवेद्याबरोबरच अळू वडी हा पदार्थ विशेष बनवला जातो.    

साहित्य :

१) तेल 
२) जिरे  
३) धणे 
४) हिंग 
५) हळद
६) मीठ
७) खाण्याचा सोडा
८) गरम मसाला 
९) मसाला 
१०) पाणी 
११) ओले खोबरे   
१२) गूळ 
१३) पांढरे तीळ
१४) दहा ते पंधरा कोकम किंवा आगूळ किंवा चिंच 
१५) कोथिंबीर  
१६) दोन वाटी चण्याचे पीठ (बेसन) 
१७) पाव वाटी तांदळाचे पीठ
१८) चार ते पाच अळूची पाने 

कृती : 

१) सर्वप्रथम चार ते पाच अळूची पाने घ्या आणि ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. अळूची पाने धुवून घेतल्यानंतर त्यांना व्यवस्थित कोरड्या कापडाने पुसून घ्या.
२) अळूच्या पानांचे लांब आणि मोठे देठ काळजीपूर्वक कापून घ्या. नंतर ही सर्व पाने लाटण्याने पोळीपाटावर किंवा मोठ्या सपाट पृष्ठभागावर नीट लाटून घ्या, ज्यामुळे ही पाने उत्तम प्रकारे दबली जातील आणि नंतर अळूच्या पानांच्या घड्या सहजपणे घालता येतील. 
३) त्यानंतर एका लहान आकाराच्या टोपात अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यात दहा ते पंधरा कोकम किंवा चिंच (आवडीनुसार) भिजत घालून ठेवा आणि ही कोकम किंवा चिंच पाच ते दहा मिनिटे पाण्यात चांगली भिजल्यानंतर त्यातून तयार झालेला रस कोकमासकट लाटलेल्या अळूच्या पानांना व्यवस्थित एकसमान लावून घ्या. अळूच्या पानांना लावण्यासाठी कोकमाचा रस, चिंचेचा रस किंवा कोकमापासून तयार केलेले आगूळ सुद्धा वापरता येईल. कोकमाचा रस किंवा चिंचेचा रस किंवा आगूळ लावल्याने अळूच्या पानांची खाज निघून जाते. हा रस पानांना लावल्यानंतर टोपात उरलेले पाणी चण्याच्या पिठाच्या मिश्रणत घालण्यासाठी बाजूला ठेवून द्या, ते फेकून देऊ नका.   
४) या कृतीनंतर अळूच्या पानांना मिश्रण लावण्यासाठी ते बनवण्याकरीता प्रथम एक मोठे भांडे घ्या. त्या भांड्यात चार ते पाच अळूच्या पानांना आवश्यक इतके दोन वाटी चण्याचे पीठ घ्या. चण्याच्या पिठात पाव वाटी तांदळाचे पीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, एक चमचा जिरे किंवा शक्यतो जिरे पूड घाला, एक चमचा धणे पूड, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे मसाला (तिखटानुसार मसाला), अर्धा चमचा खाण्याचा सोडा, अर्धा चमचा पांढरे तीळ, आवश्यकतेनुसार गोडाप्रमाणे गूळ बारीक किसून त्यात घाला, टोपातील उरलेला कोकमाचा रस किंवा चिंचेचा रस किंवा आगूळ मिश्रणात घाला, चवीनुसार मीठ घालून घ्या. हे सर्व जिन्नस चण्याच्या पिठात टाकल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. अळूच्या पानांना लावायचे मिश्रण हे जास्त पाणी घालून अजिबात पातळ बनवू नये. अळूच्या पानांना व्यवस्थित लागेल इतके घट्ट मिश्रण बनवून घ्या.
५) चण्याच्या पिठाचे मिश्रण एकदा तयार झाले की मग कोकमाचा किंवा चिंचेचा रस किंवा आगूळ लावून घेतलेली पाने घ्या. त्यातील एक पान सपाट पृष्ठभागावर किंवा पोळीपाटावर ठेवा, त्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित मिश्रण लावून घ्या, नंतर दुसरे पान घेऊन हे पान पहिल्या पानावर ठेवून त्यावर मिश्रण लावा, ही कृती पुढे तिसऱ्या आणि चौथ्या पानासाठी परत करा. मग या पानांना चारही बाजूंनी थोडेसे दुमडून घ्या, नंतर या पानांच्या आडव्या घड्या घाला. 
६) अळूच्या पानांच्या घड्या घातल्यानंतर अळूची गुंडाळी तयार होईल. (अशा पद्धतीने जास्त प्रमाणात अळूच्या वड्या बनवण्यासाठी अजून चार ते पाच पाने घेऊन अळूची पाने स्वच्छ धुवून घेण्यापासून ते पानांना मिश्रण लावण्याच्या प्रक्रियेपर्यंत वरील दिलेली कृती क्रमांक १), २), ३), ४), ५) आपण करू शकता आणि अशा पद्धतीने अळूच्या पानांची गुंडाळी आपण तयार करून घेऊ शकतो.) त्यानंतर गॅसवर एक मोठा टोप ठेवून त्यात तळाला थोडे एक ग्लास पाणी घाला, त्या टोपावर एक उकडीचे मोदक बनवण्यासाठी वापरली जाणारी बारीक होलांची चाळण ठेवा. त्या चाळणीला व्यवस्थित तेल लावून त्यात तयार केलेली अळूची गुंडाळी ठेवा आणि मग त्यावर झाकण ठेवून अळूची गुंडाळी पंधरा ते वीस मिनिट उकडायला ठेवा.
७) पंधरा ते वीस मिनिटांनंतर अळूच्या गुंडाळीत सुरी उभी खुपसून अळूची गुंडाळी व्यवस्थित उकडली की नाही हे तपासून बघा. जर सुरी खुपसून बाहेर काढल्यानंतर त्यावर पीठ लागलेले दिसले नाही तर अळूची गुंडाळी बरोबर उकडलेली आहे. 
८) नंतर अळूची गुंडाळी थंड करून घ्या, बऱ्यापैकी थंड झाल्यावर त्याच्या बारीक गोलाकार वड्या कापून घ्या. 
९) गोलाकार कापून घेतलेल्या अळूच्या वड्या तळून घेण्यासाठी गॅसवर कढई ठेवा, त्यात तेल ओता आणि ते एकदा चांगले गरम झाले की मंद आचेवर अळूच्या वड्या लालसर होईपर्यंत झटपट खरपूस तळून घ्या आणि मग गॅस बंद करा.
१०) अळूच्या वड्या तयार झाल्यावर त्या एका ताटात काढून त्यावर ओले खोबरे बारीक किसून घाला, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. अशा प्रकारे खमंग, कुरकुरीत, किंचित तिखट आणि गोडसर अशा गरमागरम अळूच्या वड्या खाण्यासाठी तयार होतील.                                 

चव :

किंचित तिखट-गोड पण चटकदार